Baramati News : किरकोळ कारणावरुन 2 कुटुंबात तुंबळ हाणामारी; तलवार, कुऱ्हाड, काट्यांनी वार

माळेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – नव्याने टाकलेल्या पाण्याच्या पाईपलाईनवरुन शेण खताचा ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात धारदार शस्त्राने तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार बारामती तालुक्यातील मालेगाव बुद्रुक ते साखर कारखाना रोड लगत असलेल्या गव्हाणे वस्ती येथे घडला. मोरे आणि गव्हाणे कुटुंबियामध्ये हाणामारी झाली असून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

मोरे व गव्हाणे कुटुंबाने तलवार, काट्या व कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने एकमेकांवर वार केले. या घटनेत जखमी झालेल्यांच्या डोक्यात, पाठीवर, हातावर वार झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये भाऊसाहेब नामदेव गव्हाणे, महादेव भाऊसाहेब गव्हाणे, ज्योती महादेव गव्हाणे, गणेश संजय गव्हाणे, प्रशांत मोरे, टॉम मोरे, आकाश मोरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही घटना मंगळवारी (दि.16) सायंकाळी घडली. या घटनेचे पडसाद मळेगाव बरोबर संबंधित कुटुंबियांच्या नातेवाईक व मित्रांपर्यंत पोहचले. यामुळे मध्यरात्री पुन्हा गव्हाणे वस्तीवर हाणामारी झाली. यावेळी चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी दुपार पर्यंत गव्हाणे वस्तीत तणावाचे वातावरण होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, जखमी गव्हाणे कुटुंबियांच्यावतीने राहुल गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार तालुका पोलिसांनी प्रशांत मोरे, टॉम मोरे, आकाश मोरे व इतर अनोळखी व्यक्तींवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच दहशत माजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे प्रशांत मोरे यांनी गव्हाणे कुटुंबियांविरोधात खुनी हल्ला केल्याची फिर्याद दिल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात गव्हाणे व मोरे यादोन्ही कुटुंबियांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश इदाते पुढील तपास करीत आहेत.