आर्मेनिया-आझरबैजान संघर्षात 16 जणांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – सीमावादावरुन आर्मेनिया आणि आझरबैजान या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु झाले आहे. तोफा, रणगाडे आणि लष्करी हेलिकॉप्टर्सच्या मदतीने दोन्ही देशांनी शत्रू पक्षाच्या भूप्रदेशावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

आर्मेनियावर आझरबैजानच्या लष्कराने सीमेनजीक असणार्‍या स्टेपनकर्ट या स्थानिक राजधानीच्या शहरातील रहिवाशी प्रदेशावर रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी हल्ला सुरु केला. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आर्मेनियाच्या सुरक्षा दलांनी आझरबैजानची दोन हेलिकॉप्टर्स आणि तीन ड्रोन पडाले. त्याचबरोबर सीमेवर असणारे आझरबैजानचे तीन रणगाडेही अर्मेनियाने उडवले. या संदर्भातील एक व्हिडिओही आर्मेनियाने जारी केला असून त्यामध्ये रणगाडे उडवण्यात आल्याचे दिसत आहे. आर्मेनियाच्या या स्पष्टीकरणावर उत्तर देताना आझरबैजानने आर्मेनियाकडून सशस्त्र दलांच्या मदतीने सुरु असणार्‍या युद्धासंदर्भातील खुरापती आणि सीमेजवळ असणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. आझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाने आर्मेनियाने केलेल्या हल्ल्यामध्ये आमच्या अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे असे म्हटले आहे. दोन्ही देश चार हजार 400 वर्ग किलोमीटरच्या भूप्रदेशावरील हक्कावरुन एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत.