कंपनीच्या ठेक्याच्या वादातून तलवारीने हाणामारी, सरपंचाच्या मुलांसह चौघांवर FIR

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यातील वाढत्या औद्योगीकरणामुळे कंपनीच्या ठेक्यावरुन अनेकवेळा वाद होताना दिसत आहे. अशाच एक प्रकार पिंपळे जगताप येथे घडल्याचे समोर आहे आहे. या मध्ये झालेल्या वादातून दोघांना तलवारीच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिली माहितीनुसार पिंपळे जगताप गावच्या सरपंचाचा मुलगा महेश जगताप व गावातील पवन जगताप यांच्यामध्ये कंपनीच्या ठेक्यातून वाद झाला होता, त्यांनतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावातील संदीप जगताप व शैलेश जगताप हे दोघे गावामध्ये गप्पा मारत उभे असताना एका स्कोर्पिओ गाडीतून महेश जगताप, विवेक जगताप, सचिन कुसेकर व प्रतिक शितोळे हे चौघेजण तलवार, काठ्या घेऊन आले व पवन जगताप याला मारहाण करू लागले यावेळी शेजारच उभा असलेला संदीप जगताप हा भांडणे सोडविण्यासाठी गेला असता महेश जगताप व विवेक जगताप या दोघांनी तू आमची भांडणे सोडवायला का आला असे म्हणून शिवीगाळ करत मारण्याची धमकी संदीप याला दिली यावेळी महेश जगताप याने हातातील तलवारीने संदीपच्या डोक्यात वार केला आणि विवेक याने काठीने मारहाण केली.

या मारहाणीमध्ये संदीप जगताप हा गंभीर जखमी झाला असून याबाबत संदीप नानासाहेब जगताप (रा. पिंपळे जगताप ,पुणे) याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पिंपळे जगताप गावच्या सरपंच विजया जगताप यांची दोन मुले महेश विजय जगताप, विवेक विजय जगताप, प्रतिक कैलास शितोळे व सचिन सुपेकर सर्व रा. पिंपळे जगताप ता. शिरूर जि. पुणे यांच्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.