बारामतीत ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांत हाणामारी !

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून हाणामारी झाली. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चार जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत कोणीही पोलिसांकडे तक्रार दिली नसल्याने पोलिसांनीही शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या हाणामारीकडे दुर्लक्ष केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यवर्ती परिसरात नगरसेविका व एका नगरसेवकामध्ये रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन वाद सुरु झाला. त्यानंतर दोन्ही नगरसेवकांचे कार्यकर्ते परस्पराला भिडले आणि त्यांच्यात हाणामारी झाली. या घटनेत नगरसेविकेचे चार कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. संबंधित नगरसेविका व काही महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी यामध्ये लक्ष घालून हे प्रकरण मिटविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे पोलीस ठाण्यात गेलेल्या महिला नगरसेविका व इतर महिला तक्रार न देताच परत गेल्या.

याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनीही मौन पाळणेच पसंत केले. आम्हाला या घटनेची माहिती कानावर आली आहे. मात्र, अद्याप कोणीही तक्रार दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सबंधित नगरसेविका व नगरसेवक यांच्यामध्ये यापूर्वी देखील काही कारणावरून किरकोळ भांडणे झाली आहे. त्याचेच पर्यवसान रविवारी हाणामारीत झाल्याची चर्चा शहरात दिवसभर होती.