परभणीत राष्ट्रवादी – शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असतानाच एका वृत्तवाहिनीच्या डिबेट कार्यक्रमात शिवसेना – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. विद्यमान खासदार संजय जाधव यांना शिवी दिली असल्याच्या करणाने हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. वृत्त वाहिन्यांचे जिल्ह्यातील निवडणुकीचे वारे काय आहे यासाठी डिबेट कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. याचदरम्यान परभणी लोकसभा मतदार संघाचे वारे काय ? यासाठी एका वृत्तवाहिनीतर्फे शहरातील वसमत रोड परिसरातील राज गोपालचारी उद्यानात डिबेट कार्यक्रम घेण्यात आला.

या डिबेटला शिवसेना – भाजपा युती, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विरोधात बोलतांना विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या बद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका करण्यात आली. असा आरोप करत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. तिथे असलेल्या खुर्च्या फेकण्यात आल्या. वादावादीचे रुपांतर हाणामारीत होऊन दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.

विशेष म्हणजे, शिवसेना पक्षाकडून विरोधी उमेदवाराबद्दल बोलण्यात येत असतांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोंधळ घालत होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शिवसेना विरोधात बोलत असतांना शिवसेने गोंधळ घालण्यास सुरवात केली. या कारणांमुळे हा सर्व गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.