तुम्ही निवडलेल्या उमेदवारावर पहिल्या दिवशीच शिक्रापुर, लोणिकंद, मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी निवडणूक मतमोजणीनंतर गुलाल न उधळणे, मिरवणुका न काढणे याबाबत आदेश जारी केले होते. परंतु शिरुर, हवेली, आंबेगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन निवडून आलेल्या सदस्याकडून जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश डावलून मिरवणूक काढून जेसीबी द्वारे कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल टाकून जल्लोष केल्या प्रकरणी शिक्रापुर, लोणिकंद, मंचर पोलीस ठाण्यात उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, तसेच पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी यादृष्टीने, कोठेही विजय मिरवणूक काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळने, परवानगीशिवाय बॅनर लावणे, असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. परंतु तरी देखील अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी आदेशाला केराची टोपली दाखवत जल्लोष साजरा केला. शिरुर तालुक्याच्या वढू बु. तळेगाव ढमढरे, तर लोणिकंद पोलिस स्टेशन हद्दीतील भावडी आणि मचंर पोलिस स्टेशन हद्दीतील खडकवाडी येथील सदस्यानी गुलाल भंडार भरून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढून माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंखन केले आहे. त्यामुळे आदेश उल्लंघन प्रकरणी अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.