योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, अ‍ॅलोपॅथी उपचार पध्दतीच्या विरोधात बोलण्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असतानाच योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावरील उपचारासंदर्भात केलेल्या विधानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात एलोपॅथी उपचारपद्धतीबद्दल त्यांनी अविश्वासर्हता दर्शवली आहे. एलोपॅथी ही मूर्ख अन् लंगडे विज्ञान आहे. सर्वप्रथम हायड्रोक्लोरोक्वीन फेल ठरले. त्यानंतर प्लाझा थेरपी अन् रेमडेसीवीर इंजेक्शनही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने संताप व्यक्त बाबा रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

कोरोनावरील उपचार पद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटीबॉयोटीक्सही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांचे मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न होता. एलोपॅथिक औषधांमुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या व्हायरल व्हिडिओसंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये, बाबा रामदेव यांनी केलेला दावा स्विकार करुन आधुनिक उपचारपद्धती बंद करावी, अन्यथा बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, आपत्ती व्यवस्थापन महामारी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करावा, असेही मेडिकल असोसिएशन संघटनेने आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना उद्देशून म्हटले आहे.