जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यातील नगरसेवक आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमीनीचे बनावट कागदपत्र तयार करून करोडे रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक युवराज बेलदरे आणि त्यांचा भाऊ नंदकुमार बेलदरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक आणि त्यांचा भावाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक युवराज बेलदरे आणि त्यांचा भाऊ नंदकुमार बेलदरे यांच्या विरोधात बांधकाम व्यावसायिक सिद्धार्थ हमेंत डांगी (वय-२७ रा. गणेश आंगण सोसायटी, नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सिद्धार्थ डांगी यांनी आंबेगाव बुद्रुक येथील हेमंत डांगी आणि पिंकी हेमंत डांगी यांची जमीन खरेदी केली होती. सिद्धार्थ यांनी या व्यवहारापोटी १ कोटी ३९ लाख १५ हजार रुपये दिले होते. दरम्यान, बेलदरे बंधुंनी या जागेची बनावट कागदपत्र तयार केली. या कागदपत्रावर सिद्धार्थ डांगी यांची बनावट सही करून करारनामा केला. या करारनाम्यात बेलदरे बंधुंनी सिद्धार्थ डांगी यांनी जमीनची विक्री करत असल्याचे नमुद केले असल्याचे डांगी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बनावट कागदपत्रे तयार करून बेलदरे यांनी जमीनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याची माहीती डांगी यांना समजल्यानंतर त्यांनी स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला. तक्रार अर्जासोबत त्यांनी जमीनीचे कागदपत्रे जोडली. डांगी यांनी जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता बेलदरे बंधुंनी यांनी बनावट कागदपत्रे तयार करून करोडो रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघडकीस आले. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या आदेशानंतर बेलदरे बंधु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खानविलकर करत आहेत.