जमीन प्रकरणात आमदार जयकुमार गोरेंना मोक्का लावा : येळगावकर

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – आ. जयकुमार गोरे यांच्या जमीन प्रकरणाने जिल्ह्याला काळीमा फासला असून मतदारसंघाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. एवढे मोठे खटले त्यांच्यावर असताना सरकारने आता त्यांना तत्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, आ. गोरे यांच्यावर ज्या जमीन प्रकरणात तक्रार दाखल आहे, त्यामध्ये जिल्ह्यातील अन्य बडे नेतेही सहभागी असल्याचा आरोप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केल्याने खळबळ उडाली आहे. येळगावकरांच्या या आरोपानंतर गोरे समर्थकांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप कराल तर खबरदार, असा इशारा येळगावकर यांना दिला आहे.

पुनर्वसनापोटी नवी मुंबईतील खारघर येथे मिळालेल्या जमिनीत भागीदार करुन घ्या नाहीतर त्याबदल्यात दहा कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली असल्याचा आरोप करत आंबेगाव (पुणे) येथील श्रीकृष्ण गोसावी यांनी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर खंडणी मागितल्याची तक्रार नवी मुंबई पोलिसांत केली आहे. त्या अनुषंगाने माजी आ. येळगावकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेवून आ. गोरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, माण-खटाव विधानसभा मतदार संघाचा आणि खारघर (पनवेल) येथील पुनर्वसनाचा काहीएक संबंध नाही. पुनर्वसनातील ही जमीन लाटायचीच हाच केवळ त्यांचा उद्देश आहे. यामध्ये फक्त आ. गोरेच नाहीत तर सातारा जिल्ह्यातील आणखी काही बडे नेते असून लवकरच आपण त्यांचा भांडाफोड करणार आहे.

येळगावकर यांनी अशाप्रकारे गंभीर आरोप केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. येळगावकर यांनी आरोप केल्यानंतर आ. गोरे यांच्या समर्थकांनीही पत्रकार परिषदे घेतली. माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना जनतेने निवडून दिले आहे. गेली दोन टर्म ते निवडून येत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना माजी आमदार दिलीप येळगावकरांनी जपून बोलावे. आ. गोरेंना आडविण्यासाठी येळगावकरांसारख्या बऱ्याच जणांचे प्रयत्न सुरू असतात. तरीही त्यांच्या कृत्यांना आ. गोरे. पुरुन उरले आहेत. त्यांचे काम ते जोमाने करत आहेत. मुळातच येळगावकरांचे स्वत:चे हात भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आ. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करु नयेत, असा गर्भित इशारा वडूजचे नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव यांनी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला.