अजित पवार, जयंत पाटलांच्या अडचणी वाढणार? FIR दाखल करण्याची भाजप नेत्याची मागणी, जाणून घ्या कारण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार, सोशल डिस्टन्सिंगसह इतरही नियमांचे पालन करावे असे सांगण्यात येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील हे हजारोंच्या बैठका घेत आहेत. त्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोघांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. मात्र, पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सरकार गुंग आहे. मुंबई, पुण्यासह नागपूरही कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट बनला आहे. अशा स्थितीत राज्य सरकार विदर्भातील ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत आहे. गर्दी टाळण्याचे सातत्याने सांगितले जात असताना अजित पवार आणि जयंत पाटील हे हजारोंच्या बैठका घेत आहेत. या बैठकांमुळे कोरोना व्हायरस सुपर स्प्रेडर बनत आहे. अशाप्रकारे बैठका घेतल्या जात असताना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर एफआयआर दाखल करावी.

दरम्यान, ग्रामीण भागातील लोकांकडे लक्ष द्यायला हवे. या भागातील जनता चिडली आहे. याकडे दुर्लक्ष केले तर ग्रामीण भागातील लोकं रस्त्यावर उतरतील. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. कोरोना व्हायरसचे कारण देत विरोधकांना आंदोलन करण्यापासून रोखले जात आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे, असेही ते म्हणाले.

…तर आम्ही रस्त्यावर उतरू

ग्रामीण भागातील जनता चिडली आहे. वीज प्रश्नावरही ठोस निर्णय घेतला नाही, तर आम्ही 10 हजार लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आणि वास्तव मांडू, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला. ग्रामीण भागातील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे, असे बावनकुळे म्हणाले.