WhatsAppवर धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश टाकणं 11 जणांना भोवलं, FIR दाखल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशासह राज्यातील विविध भागात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. असे असताना व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश टाकल्याप्रकरणी एका ग्रुपच्या अ‍ॅडमीनसह 11 जणांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रुपवर धार्मिक तेढ व दुही निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसांना कारवाई केली आहे.

दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारा मेसेज एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर टाकण्यात आला होता. ग्रुपच्या 10 अ‍ॅडमीनसह संदेश टाकणार्‍या अन्य एक अशा 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बोईसर येथील एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, एकोप्यात बाधा निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल या दृष्टिकोनातून व्हॉट्स अ‍ॅपवर एक पोस्ट टाकण्यात आली होती.

या ग्रुपवर प्रसारित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांना ट्विटरवरुन तक्रार प्राप्त झाली होती. बोईसर पोलिसांनी त्या अनुषंगाने व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन व पोस्ट टाकणार्‍या आरोपीविरोधात माहिती घेत त्यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.