सांगली : ‘कोरोना’ग्रस्तावर उपचारास नकार देणार्‍या 8 आरोग्य कर्मचार्‍यांवर FIR दाखल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार देणार्‍या खासगी रुग्णालयातील आठ आरोग्य कर्मचार्‍यांच्या विरोधात ’मेस्मा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिरजेच्या महात्मा गांधी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे.त्यामुळे पालिकेकडून खाजगी रुग्णालयांमध्ये ही कोविड सेंटर निर्माण करण्यात आली आहेत. खासगी रुग्णालयात सुद्धा कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणी कोरोना उपचारासाठी दाखल होणार्‍या रुग्णांवर येथील आरोग्य कर्मचार्‍यांनी उपचार करण्यास नकार दिला होता.

कोवीड सेंटर याठिकाणी सुरू झाल्यापासून या खासगी हॉस्पिटल मधील आठ कर्मचारी हे ड्युटीवर हजर झाले नाहीत. हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना वारंवार याबाबत समज देण्यात आला होते,मात्र तरीही त्या कर्मचार्‍यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला. त्यानुसार आरोग्य विभागाने चौकशी करत त्या खासगी हॉस्पिटलमधील 8 आरोग्य कर्मचार्‍यांच्या विरोधात ”भारतीय साथरोग नियमन अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.