अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या विरोधात ‘ही’ तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसने उत्तर मुंबईतून निवडणुक रिंगणात उतरविलेल्या उर्मिला मातोंडकर हिला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भाजपमध्ये चलबिचल वाढली असून आता त्यांनी तिच्या विरोधात हिंदुच्या भावना दुखावल्याचे सांगत पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. उर्मिलाला रोखण्यासाठी भाजपने आता हिंदूंचे धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

उर्मिला मातोंडकर हिने एका टीव्ही शोमध्ये बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याने हिंदुंच्या भावना दुखावल्याचे सांगत भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने ही वक्तव्ये राहुल गांधी यांच्या सांगण्यावरुन केली असल्याचे तारे तोडले आहेत. उर्मिलासह राहुल गांधी आणि राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली असे नाखवा यांनी म्हटले आहे.

उर्मिला मातोंडकर हिने एका टीव्ही शोमध्ये बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. दोन दिवसांपूर्वी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला तिने एक मुलाखत दिली होती. त्यात तिने असे म्हटल्याचा दावा केला आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकर म्हणाली, माझे पती मुसलमान असले तरी मी हिंदूच आहे आणि त्याचा आम्हा दोघांना गर्व आहे. आपल्या देशात एक प्रकारची विविधता आहे. ज्याला जसे राहायचे आहे. तसे तो राहू शकतो.

उत्तर मुंबईत २००४ मध्ये अभिनेता गोंविदाने भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर संजय निरुपम यांनी २००९ मध्ये विजय मिळविला होता. आता काँग्रेसने उर्मिला मातोंडकर हिला रिंगणात उतरविले आहे. तिला पहाण्यासाठी रस्त्यावर झुंबड उडत असून उर्मिलाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना गोंविदाच्या प्रचाराची आठवण येत आहे. त्यामुळे उर्मिलाला रोखण्यासाठी आता भाजपने नेहमीचा हातखंडा प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचे दिसून येते. त्यातूनच तिचा पती मुसलमान असल्याचे व ती हिंदूच्या भावना दुखावत असल्याचे मतदारांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे.