फाईल चोरी प्रकरणी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक निलंबित

मुंबईः

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालायातून फाईल चोरी झाल्याप्रकरणी महामंडळाचे महाव्यवस्थापक दत्तात्र झोंबाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे. तसेच चोरी करणारे चोरटे हे अटकेत असलेले राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांचा भाऊ आणि त्याचे साथीदार असल्याचे समोर आले आहे.

कार्यालयाचं कुलूप तोडून फाईल्सची चोरी

सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 385 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित फाईल्स आहेत. मात्र त्यापैकी काही फाईल्स चोरट्यांनी पळवल्या आहेत.

महामंडळाच्या कार्यालयाचं सील तोडून काही फाईल्स पळविण्यात आल्याची तक्रार दहिसर पोसीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, या फाईल्स साठे महामंडळातील घोटाळ्याच्या आहेत की इतर कोणत्या प्रकरणातील आहेत हे मात्र अद्याप कळू शकले नाही.