मोदींची सतत पाठराखण करणाऱ्या अनुपम खेर यांचाच मोदी सरकारला ‘घरचा आहेर’; म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  देशभरात कोरोनाचे थैमान अद्याप सुरुच आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य सेवा-सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पहिल्यांदाच उघड टीका केली. ‘सध्या सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरं काही महत्त्वाचे आहे, हे समजून घेण्याची गरज आहे’, असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.

अनुपम खेर हे पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे समर्थक असल्याचे त्यांच्या अनेक वक्तव्यातून सर्वांनाच माहिती झाले आहे. त्यांनी यापूर्वी मोदी सरकारविरोधी बोलणाऱ्यांना खडेबोलही सुनावलेले आहेत. पण आता कोरोना परिस्थितीवरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ‘सध्या जी टीका होत आहे, ती बऱ्याच उदाहरणांमध्ये सत्य आहे. सध्या ज्या जनतेने सरकारला निवडून दिलेले आहे, त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. सरकारला ज्या कामासाठी निवडून देण्यात आलेले आहे ते काम सरकारने करायला हवे. देशात मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचे दिसत आहे. एखादी मानवी मन नसलेली व्यक्तीच ही घटना पाहून दु:खी होणार नाही’.

दरम्यान, एनडीटीव्हीने अनुपम खेर यांना एका कार्यक्रमात बोलावले होते. त्यादरम्यान अँकरने अनुपम खेर यांना ‘देशात रुग्ण, त्यांचे नातेवाईक रुग्णालयासमोर रडताना दिसत आहेत. त्यांना रुग्णालयात प्रवेश दिला जात नाहीये. अशावेळी सरकारने स्वत:ची प्रतिमा सांभळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वाटत नाही का?, असा सवाल केला. त्यावर अनुपम खेर यांनी परखड मत व्यक्त केले.