कोल्हापूर पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन 

पोलिस ठाण्यातून चार कुख्यात आरोपी पळून जातात ही कोल्हापूर पोलिसांसाठी लाजीरवाणी बाब होती. शाहूवाडी पोलिस ठाण्यात घडलेल्या या प्रकारानंतर जिल्ह्यातील संपूर्ण पोलिसदल हादरून गेले होते. पण, अवघ्या चोवीस तासांत चार पैकी दोन आरोपींना पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले. वडगाव पोलिसांनी किणी टोल नाक्यावर रचलेल्या सापळ्यात हे अडकले. एखाद्या चित्रपटातील सीन शोभावा, अशा पद्धतीने पोलिसांनी ही कारवाई केली.

शाहूवाडी पोलिस ठाण्यातून सूरज सर्जेराव दबडे, ओंकार महेश सूर्यवंशी, गोविंद वसंत माळी आणि विराज गणेश कारंडे यांनी पळ काढाला होता. त्यांना पकडण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासूनच कोल्हापूर ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यास सुरुवात केली होती. यात पुणे-बेंगळुरू महामार्गाचा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात येत होता.

वडगाव पोलिस ठाण्याकडून महामार्गावर शोध मोहीम राबविण्यात येत होती. त्यासाठी साध्यावेशातील पोलिस आणि त्यांना खासगी वाहने वापरण्याची सूचना पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिली होती. सकाळी सातच्या सुमारास तांदूळवाडी येथील विठ्ठल मंदिरात दोघे तरुण तोंडाला रुमाल बांधून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पण, पोलिस तेथे पोहचेपर्यंत दोघे तेथून पसार झाले होते. दोघे चोरलेल्या मोटारसायकलीवरून किणी टोल नाक्याच्या दिशेने येत होते. त्यांच्या मागे साध्या वेशात पोलिस कॉन्सटेबल संदीप गायकवाड आणि पोलिस नाईक बाबासाहेब दुकाने पोलिस पाठलाग करत होते.

नाक्यावर पोलिस असल्याच्या भितीने दोघांनी मोटारसायकल मागे वळविली. त्याचवेळी गायकवाड आणि दुकाने यांना त्यांच्यावर संशय आला. नाक्यावर तैनात करण्यात आलेल्या साध्या वेशातील पोलिसांनाही संशय आल्याने त्यांनीही त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. आपल्या दिशने येत असलेल्या दोघांवर झडप टाकून पोलिसांनी त्यांना पकडले. गायकवाड आणि दुकाने यांनी दोघा आरोपींना जमिनीवर पाडून पकडून ठेवले होते. नाक्यावरील पोलिस आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. अवघ्या २४ तासांत कारवाई करून दोघा आरोपींना पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले असले तरी सूरज दबडे आणि गोविंद माळी यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

दोन मोटारसायकली चोरल्या

पळून गेलेल्या सूरज आणि ओंकार यांनी दोन मोटारसायकली चोरल्या होत्या. पोलिस ठाण्यातून पळाल्यानंतर त्याच परिसरातील एक मोटारसायकल त्यांनी लांबविली होती. त्यातील पेट्रोल संपल्यानंतर ती कोडोली परिसरात सोडून देण्यात आली. पण, त्यानंतर त्याच परिसरातून दुसरी मोटारसायकल चोरून त्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्ग गाठला होता.

संबंधित घडामोडी:

शाहूवाडी पोलीस ठाण्यातील लॉकअप मधून चार आरोपींनी ठोकली धूम

कोल्हापूरातील ‘ते’ झोपलेले पोलीस निलंबित

लाॅकअपमधून फरार झालेल्या चार पैकी दोन आरोपींना पेठ वडगाव पोलिसांनी पकडले