बँक ऑफ महाराष्ट्रवर फिल्मी स्टाईल दरोडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- कराड तालुक्यातील शेणोली येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर सोमवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी बॅंकेत गोळीबार करत २२ लाख व १० तोळे सोन्याचे दागिने लुटले.

भरदुपारी बँकेत पडलेल्या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सोमवारचा दिवस असल्याने बँकेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु झाले होते. त्यावेळी दुपारी पावणे चारच्या सुमारास कामकाज सुरु असताना अचानक दोन चारचाकी वाहनांमधून आलेल्या चौघांनी हातात पिस्तूल घेऊन बँकेत प्रवेश केला. त्यानंतर पिस्तूलातून भिंतीवर गोळीबार करून दहशत निर्माण केली. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ग्राहकांना सेफ रुममध्ये कोंडून ठेवले.व त्यानतंर कॅश कॅबीन व स्ट्रॉंग रुममधील २२ लाख रुपयांची रोकड आणि १० तोळे सोन्याचे दागिने पोत्यात भरले. त्यानंतर कर्मचारी व ग्राहकांचे ५ मोबाईल घेऊन तेथून पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लागलीच दरोडेखोरांच्या मागावर साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. तसेच नाकाबंदी केली आहे.