Hinjewadi News : चित्रपट खरेदी-विक्री व्यवसायात सहभागी करुन घेण्याचे आमिष दाखवून चित्रपट निर्मात्याची फसवणूक

हिंजवडी (Hinjewadi )/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चित्रपट खरेदी विक्रीच्या व्यवसायात सहभागी करुन घेण्याचे आमिष दाखवून एका चित्रपट निर्मात्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी (Hinjewadi ) पोलिसांनी तक्रार अर्जावरुन विक्रम धाकतोटे (वय-38 रा. रुम नं. 444, शिवछाया सोसायटी, राहुलनगर, विक्रोळी पश्चिम, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी चित्रपट निर्माता व विक्री करणारे अमोल लक्ष्मण कागणे (वय-29 रा. ए/3, मॅपल टावर, जांभुळकर चौक, वानवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2019 ते 22 जून 2020 या कालावधीत केपीआयटी कमिन्स जवळ, हिंजवडी येथे आणि ऑनलाईन माध्यमातून घडला आहे. तक्रार अर्जावरून चौकशी केल्यानंतर 12 जानेवारी 2021 रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात विक्र धाकतोडे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कागणे हे चित्रपट निर्माता व विक्रीचा व्यवसाय करता. तर आरोपी धाकतोडे चित्रपट विक्रीसाठी मध्यस्थी करण्याचे काम करतो. धाकतोडे याने कागणे यांना चित्रपटाच्या अॅग्रीमेंटमध्ये घेतो आणि काही चित्रपट कागणे यांच्या नावावर करुन देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने कागणे यांच्याकडून काही रक्कम घेतली.

आरोपीने कागणे यांच्याकडून हिंजवडी येथे रक्कम घेतली. त्या नंतरची रक्कम ऑनलाईन घेतली. फिर्यादी यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा वापर इतर कारणांसाठी केला. तसेच फिर्यादी यांच्या नावावर घेतलेल्या चित्रपटांची परस्पर विक्री केली. विक्री केलेल्या चित्रपटांची रक्कम फिर्यादी यांना न देता आरोपीने त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे करीत आहेत.