उच्चशिक्षण मंत्र्यांचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा खुलासा ! अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे. विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार असून वर्षभरात मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांना ग्रेड दिला जाणार असल्याची माहिती उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. यामुळे उच्चशिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थी आणि पालकांची चिंता दूर होणार आहे.

अंतीम वर्षाच्या परीक्षा घेयच्या की नाही यासाठी शनिवारी मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री आणि कुलगुरुंची व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे चर्चा झाली. दोन तास या विषयावर चर्चा झाल्यानंतर काही गोष्टींवर एकमत झाले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात परीक्षा न घेता अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार गुण देण्यावर एकमत झाले असल्याचे उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ही माहिती दिली.

दिलेल्या ग्रेडवर जर कुणाचा आक्षेप तर तर परीक्षा देण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बाबतचा अंतीम निर्णय लवकरच होईल, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील चिंतेत असलेल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश
एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती व वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी व पालकांच्या मनातील चिंता संपवली पाहिजे, त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. तसेच अंतिम वर्षासाठी सर्व विषयांच्या सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पार्यय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पहाण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी विद्यापीठांचे कुलगुरुंसमवेत व्हिडिओ कॉन्फरसन्सींगद्वारे बैठक झाली. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागाचे सचिव सौरभ विजय, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ इत्यादी सहभागी झाले होते.