म्हाडाच्या निकृष्ट बांधकामाच्या चौकशीसाठी समिती !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सर्वसामान्यांसाठी म्हाडाकडून बांधण्यात येणार्‍या घरांच्या बांधकामाच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. वर्षांनुवर्षे बी. जी. शिर्के कंपनी ही म्हाडा इमारतींच्या बांधकामांची कंत्राटदार आहे.
म्हाडाच्या इमारतींचे बांधकाम गेली अनेक वर्षे निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले होते.

त्याची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. याबाबत गृहनिर्माणमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा राधाकृष्ण विखेपाटील यांनी दखल घेतली आणि शिर्के कंपनीला जाब विचारला. म्हाडा इमारतींच्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी प्रस्तावित केले होते. महाविकास आघाडी सरकारने आता याप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे.

गृहनिर्माण विभागातील उपसचिवांकडे या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, तर म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील मुख्य अभियंता तसेच वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिटयूटच्या स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख यांचा समितीमध्ये समावेश केला आहे. म्हाडा इमारतींचे या आधीचे प्रकल्प तसेच सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांतील बांधकामांची पाहणी करून या समितीला अहवाल सादर करायचा आहे.