‘…अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात आलं व्हिजन’ : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्याचा मागास भाग मुंबई शहराशी जोडला जाऊ शकतो. शिवसेना पक्षानं त्यावेळी समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध केला होता. आता मात्र ते याच्या बाजूने आहेत याचे समाधान आहे, अशी टिप्पणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात आलंय समृद्धी महामार्गाचं व्हिजन.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. याबाबत आनंद आहे. त्यांना देखील व्हिजन लक्षात आलंय, कशा पध्दतीनं महाराष्ट्र बदलू शकतो?,असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 21 व्या शतकामध्ये भारत देश जी प्रगती करत आहे ते संविधानामुळेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान महत्त्वाचे आहे. त्याचा सर्वांनी विचार करायला हवा. जात पंचायती विरोधात कायदा केलेले महाराष्ट्र हे राज्य आहे. समाजात चुकीच्या प्रवृत्ती असतात. त्या बाजूला ठेवल्या पाहिजेत. अशा प्रवृत्तींना बाजूला ठेवण्याचे काम सगळ्यांनी करायला हवंय.

कोरोना विषाणूच्या संकटात गर्दी करू नका, असे शासनाच्या वतीने आवाहन केले होते. त्याला आंबेडकर अनुयायांनी उत्तम प्रतिसाद दिलाय, याचा आनंद आहे, असेही फडणवीस यांनी म्हंटलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, शनिवारी अमरावती, औरंगाबाद या दोन शहरांचा दौरा केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतलाय. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी स्वतः कार चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केलीय. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते.

ऐरवी उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस सध्या एकमेकांवर टीकेची तोफ डागण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. परंतु, उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा घेऊन कामाबाबत समाधान व्यक्त केलंय. मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या ड्रीम प्रोजेक्टचं कौतुक केलंय, असेच म्हणावं लागत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट ठरलेल्या समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्र्यांनी विश्वास टाकला का?, अशी जोरदार चर्चा सुरू झालीय.

शिवसेना पक्षाचा समृद्धी महामार्गाला होता विरोध
या अगोदर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचा मुद्दा चांगलाच तापला होता. शिवसेना पक्षानं या महामार्गाला एकदा नाही अनेकदा विरोध केलाय. मात्र, हा विरोध झुगारून फडणवीस सरकारने महामार्गाचं काम सुरू ठेवलं होतं. त्यानंतर शिवसेना पक्षानं समृद्धी महामार्गाला ’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असं नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणार्‍या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे नामकरण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे केले आहे.