अखेर संभाजी बिडीचे नाव बदलले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक वर्षापासून संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड, अनेक शिवप्रेमी संघटना आणि काही राजकीय संघटना लढत होत्या. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देऊन विक्री केल्या जाणाऱ्या संभाजी बिडीचे नाव अखेर बदलले आहे. विविध शिवप्रेमी संघटनांकडून होत असलेल्या तीव्र विरोधानंतर साबळे वाघिरे कंपनीने चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता ही बिडी नव्या नावासह बाजारात येऊ घातली आहे. आता विडी साबळे बिडी या नावाने विकली जाणार आहे.

संभाजी बिडीचं नाव बदलावे यासाठी बिडीच्या उत्पादकांवर निषेध, आंदोलने तसेच कायदेशीर कारवाईचा इशारा देऊन दबाव आणला जात होता. नाव बदलण्याच्या निर्णयामुळे आतापर्यंत संभाजी बिडी या नावाने विकली जाणारी विडी आता साबळे बिडी या नावाने विकली जाणार आहे. विविध शिवप्रेमी संघटना आणि लोकभावनेचा मान राखून आम्ही या उत्पादनाचे नाव बदलले असल्याचे या साबळे-वाघिरे कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी सांगितले.