शिवप्रतिष्ठानमध्ये फूट, आता ‘शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ नवी संघटना

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – शिवप्रतिष्ठानममधून निलंबित केलेल्या कार्यवाह नितीन चौगुले यांनी रविवारी (दि. 21) कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या नव्या संघटनेची घोषणा केली. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही राजकारणविरहित संघटना असून संपूर्ण राज्यात विविध क्षेत्रात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठानमधील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

नितीन चौगुले यांना शिवप्रतिष्ठानमधून निलंबित केल्यापासून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर रविवारी समर्थकांच्या मेळाव्यात चौगुले यांनी आपली भूमिका मांडत नव्या संघटनेची घोषणा केली. यावेळी चौगुले म्हणाले की, संभाजीराव भिडे यांच्या आदेशानुसार 20 वर्षापासून शिवप्रतिष्ठानमध्ये काम करत होतो. 2013 पासून पूर्णवेळ काम करताना अनेक उपक्रम प्रभावीपणे राबवले. मात्र संघटनेतील काही जणांना हे काम सहन न झाल्याने त्यांनी माझ्यावर आरोप करून बदनामी सुरु केली. तसेच त्यांनी शिवप्रतिष्ठानमधून माझे निलंबन केले. संघटनेतून निलंबित केले तरी कार्यकर्त्यांच्या मनातून कोणीही निलंबित करू शकत नाही, असे ते म्हणाले. शिवप्रतिष्ठानमधून निलंबित केले असले तरी संभाजी भिडे यांच्याविषयी आदर कायम असणार आहे, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच नवीन संघटनेचे काम करणार असल्याचे ते म्हणाले.