अखेर मंत्री विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर, ‘माझी नाराजी पक्षाविरोधात नव्हती तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे नेते आणि ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. आजच त्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्विकारला आहे. अखेर पाच दिवसांनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. आज त्यांनी मदत व पुनर्वसन खात्याचा पदभार स्विकारला आहे.

‘माझी नाराजी माझ्या पक्षावर नाही’

एका वृत्तवाहिनीशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “माझी नाराजी माझ्या पक्षावर नाही. माझ्या पक्षाकडे असलेलं खातं हे शिवसेनेकडे आहे याबाबत होती. ते खातं आमच्या पक्षाला मिळालं पाहिजे असं मला वाटत होतं. त्या खात्याचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागाशी संबंध आहे. मदत पुनर्वसन हे खातं जे आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला, अतिवृष्टी झालेल्या बेघर माणसाला मदत करणारं, महाराष्ट्रातील गरिबांची सेवा करणारं खातं होतं. या खात्याबरोबर शेतकऱ्याला आणि मागासवर्गीयांना आधार देणारं खातं आहे. माझा आग्रह यासाठी होता की ते खातं काँग्रेसच्या वाट्याला होतं. म्हणून मी पदभार दोन दिवस उशीरा स्विकारला. परंतु आज माझ्या हायकमांडसोबत माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की, ते डिपार्टमेंट आपण घेणार आहोत. ते खातं तुम्हाला देऊ. मला माझ्यापेक्षा या मंत्रिपदाचा उपयोग राज्यातील शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे.”

अधिवेशन आणि इतर ठिकाणच्या त्यांच्या गैरहजेरीबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “माझ्या कुटुंबाचं महत्त्वाचं काम होतं. मी बाळासाहेब थोरातांना सांगून गेलो होतो.”

‘नाराजी दूर करण्यासाठी भविष्यात तुम्हाला मोठी जबाबदारी देऊ’

पुढे बोलताना ते म्हणाले, “माझं बोलणं खर्गे आणि वेणुगोपाल यांच्याशी झालं. त्यांनीच मला सांगितलं होतं की, जे खातं शिवसेनेकडे आहे ते तुम्हाला देऊ. तुमची नाराजी दूर करण्यासाठी भविष्यात तुम्हाला मोठी जबाबदारी देऊ असंही त्यांनी मला सांगितलं. यानंतर त्यांनी मला पदभार स्विकारण्यासाठी सूचना दिल्या.” असेही त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/