औरंगाबाद : अखेर कृत्रिम पाऊस पडला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाची आतुरतेने वाट पहात असलेल्या व त्यासाठी आता कृत्रिम पावसाकडे डोळे लावून बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून उपयुक्त ढगाची शोधाशोध केल्यानंतर मंगळवारी अखेर कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. मात्र, पुढील दोन आठवडे देशात मॉन्सून क्षीण असल्याने या प्रयोगासाठी आवश्यक असलेल्या ढगांची उपलब्धता अतिशय कमी असण्याची शक्यता आहे.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी उपयुक्त ढग असल्यामुळे मंगळवारी जालना तसेच घनसांवगी तालुक्यातील काही गावांमध्ये विमानातून ६ फ्लेटस सोडण्यात आल्यानंतर काही ठिकाणी पाऊस झाल्याची माहिती महसूल उपायुक्त सतीश खडके यांनी दिली आहे.

जुलै महिन्याच्या अखेरीस कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होणार होती. मात्र, शासनाने उशिरा घेतलेल्या निर्णयामुळे किमान १५ ते २० दिवस उशीर झाला. १४ ऑगस्टपासून या प्रयोगासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा तयार होती. मात्र, आकाशातच आवश्यक तेवढे ढग नव्हते. मंगळवारी सायंकाळी जालना जिल्ह्यातील घनसावंगी परिसरात उपयुक्त ढग असल्याचे डॉप्लर रडारवरुन दिसून आले. त्यानंतर सोलापूर विमानतळावरुन विमानांनी सायंकाळी साडेपाच वाजता उड्डाण केले. जालना जिल्ह्यातील बेलगाव, हासनखेडा व भटाण या परिसरातील गावांवर ६ ते ८ रसायनांच्या नळकांड्यांद्वारे ढगांवर फवारणी करण्यात आली. त्यानंतर काही गावांमध्ये पाऊस पडल्याची माहिती आहे. या परिसरात किती पाऊस पडला याची माहिती गोळा करण्यात येत आहे.

कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला असला तरी पुढील काही दिवसांचा हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता या प्रयोगासाठी मेघ असलेले ढग उपलब्ध होण्याची शक्यता खूप कमी आहे. २५ ऑगस्टनंतर राज्यातील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर परतीचा पाऊस सुरु होतो. त्या काळात मराठवाड्यात पाऊस होतो.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जुलैअखेर आणि ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने झोडपून काढले होते. त्यावेळी मराठवाड्यातही पावसाळी ढग दिसून येत होते. पण सरकारने केवळ घोषणाबाजी केली. आवश्यक ते आदेश न काढल्याने हा प्रयोग सुरु होण्यास उशीर झाला. जर हा प्रयोग ठरविल्याप्रमाणे जुलैअखेरीस सुरु झाला असता तर मराठवाड्यात या प्रयोगाला चांगले यश मिळाले असते. व मराठवाड्यातील पिकांनाही जीवदान मिळण्यास मदत झाली असती, असे सांगितले जात आहे.