नगर : अखेर वन विभागाकडून ‘तो’ बिबट्या जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात पहाटे भक्ष्याच्या शोधार्थ असलेला साधारणत: एक वर्षे वयाचा नर बिबट्या वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केला आहे. काही दिवसांपासून माणिकदौंडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. तो बिबट्या जेरबंद करण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

पाथर्डी तालुक्यात गेली एक वर्षापासून गर्भगिरी डोंगररांगांचा समावेश असलेल्या तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात बिबट्याचे अस्तित्व आढळून आले होते. परिसरातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वन विभागाकडे केली होती. त्या अनुषंगाने वनविभागाच्यावतीने माणिकदौंडी परिसरात सापळा लावण्यात आला होता.

आज पहाटे या पिंजऱ्यात भक्ष्याच्या शोधार्थ आलेला बिबट्या अडकल्याचे स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी वनविभागाला तात्काळ कळविले. त्यानंतर बिबट्याला पाथर्डी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिका-यांकडून तपासण्यात करून बिबट्याला वनविभागाच्या वतीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे, असे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

पाथर्डी तालुक्याच्या दक्षिण बाजूला बीड-नगर जिल्ह्याच्या हद्दीवर गर्भगिरी डोंगराच्या पर्वतरांगा आहेत. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील वनहद्दीत असलेले वन्यजीव अन्न पाण्याच्या शोधार्थ स्थलांतरण करीत आहेत. पाथर्डीसह संगमनेर, अकोलेेेे तालुक्यात बिबट्याचे अस्तित्व जाणवत आहे.