ठाकरे सरकारकडून उजनीच्या पाण्याचा आदेश रद्द !

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून उजनीच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे. अखेर आंदोलकांच्या आक्रमक पावित्र्यापुढे सरकारने नमतं घेतलं आहे. राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत जयंत पाटील यांनी काढलेला तो लेखी आदेश रद्द केला आहे. जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. यावरून वाद पेटला होता. अखेर हा आदेश रद्द करण्यात आला आहे.

जयंत पाटील यांनी 18 मे रोजी उजनी धरणातून सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला देणार नाही. तसा या पूर्वी काढलेला सर्वेक्षण आदेश रद्द करण्याचे तोंडी सांगितले होते. मात्र, जोपर्यंत लेखी आदेश मिळत नाही. तोपर्यंत आंदोलनाचा पावित्रा घेण्यात आला होता. अखेर आज उप सचिव यांनी 22 एप्रिल 2021 रोजी काढलेला आदेश रद्द केल्याचे पत्रक काढले.

दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील उजनी पाणी प्रश्न घेऊन शेतकरी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे गेले होते. उजनी धरणातून बारामती आणि इंदापूर जिल्ह्याला पाणी देण्यास विरोध करत उजनी बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते इस्लामपूर येथे जयंत पाटील यांच्या कारखान्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार होते. यावेळी पोलिसांनी कारखान्यावर थांबवून ठेवले. पोलिसांनी मज्जाव केल्याने कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या बाचाबाची झाली. तर याची दखल घेत पाटील यांनी त्वरित हा आदेश रद्द करण्यात आला आहे, असे स्पष्ट केलं. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.