जिओ इन्स्टिट्यूटला सर्वोत्तम दर्जा देण्यास अर्थ खात्याचा विरोध 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

रिलायन्स समूहाच्या प्रस्तावित जिओ इन्स्टिट्यूटला देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या निर्णयाची देशभरात खिल्ली उडविली जात आहे. आता केंद्रीय अर्थ खात्यानेही त्यास तीव्र आक्षेप घेतला असल्याचे उघड झाले आहे. अद्याप अस्तित्वात न आलेल्या संस्थेला सर्वोत्तम संस्था म्हणणे हे तर्कविसंगत असून शैक्षणिक क्षेत्रासाठीही ते हानीकारक आहे, असे मत अर्थ खात्याने नोंदविले असून या निर्णयाला विरोध केला होता.

[amazon_link asins=’B077PWBC7J,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce469cfe-ab44-11e8-b860-e9d41da7d2ed’]

जुलै महिन्यात भारतातील सहा सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादी मनुष्यबळ विकास खात्याने जाहीर केली होती. या संस्थांना केंद्राकडून शेकडो कोटींची मदत मिळणार आहे. अजून अस्तित्वात न आलेल्या आणि केवळ कागदावर असलेल्या जिओ इन्स्टिट्यूटची यासाठी वर्णी लागल्याने संपूर्ण देशात या निर्णयावरून मोदी सरकारवर टीका होत आहे. सोशल मीडियावरही या निर्णयाची दररोज खिल्ली उडविली जात आहे. या निवडीचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी समर्थन केले होते.

अर्थ खात्याचे या निर्णयाबाबत काय मत आहे हे माहिती अधिकार कायद्यानुसार मागविलेल्या माहितीतून उघड झाले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात माहिती मागितली होती. यामध्ये म्हटले की, अस्तित्वात नसलेल्या शैक्षणिक संस्थेला सर्वोत्तम दर्जा बहाल करण्याचा निर्णय किमान वर्षभर तरी घेतला जाऊ नये, असा इशारा अर्थ खात्याने दिला होता. गेल्या वर्षीच जिओ इन्स्टिट्यूट निवडीचा प्रस्ताव असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने अर्थ खात्याला कळवले होते. त्यावर अर्थ खात्याच्या खर्चविषयक निर्णय समितीने २३ फेब्रुवारी २०१७ रोजी कळवले की, अद्याप स्थापनही न झालेल्या खासगी शैक्षणिक संस्थांना, त्यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या भविष्यातील योजनांच्या आधारे सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेचा दर्जा देणे हे तर्काच्या पलीकडचे आहे आणि त्याला कोणताही आधार नाही. या बाबतीतले प्रचलित निकष अगदी स्पष्ट आहेत आणि त्यात प्रस्तावित संस्था बसू शकत नाही. यांसदर्भात अर्थखात्याच्या समितीने पाठविलेल्या पाच पानी पत्रात म्हटले होते की, श्रेष्ठत्वाचा दर्जा या पद्धतीने देण्याने, या क्षेत्रात आधीच कार्यरत असलेल्या संस्थांच्या तुलनेत जी संस्था अजून स्थापनही झालेली नाही तिचा नावलौकिक वाढण्यास आणि स्थान पक्के होण्यास मदतच होईल. त्याने कार्यरत संस्थांचे खच्चीकरण होईल आणि उच्च शिक्षण क्षेत्राची त्यामुळे हानी ओढवेल. केवळ त्या संस्थेचे हेतू पाहून  तिला उत्तम ठरवणे हे तर्कबुद्धीला न पटणारे असून त्यामुळे हा प्रस्ताव मागे घ्यावा.

शिवसेना लोकसभेच्या सर्व जागा लढणार