…असे झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात निवडणूकीचे कल तर समोर आले परंतू आता तिढा निर्माण झाला आहे तो सत्ता स्थापनेचा. मुख्यमंत्री कोणाचा यावरुन वातावरण तापले आहे. राज्यात अजून सत्ता स्थापन करण्यास जो उशीर झाला आहे त्याला कारण हाच तो मुद्दा ठरला आहे. शिवसेना आपल्या मुद्यावर अडून आहे तर भाजप देखील मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही, याच परिस्थितीवर भाष्य करताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्याची सर्व सूत्र राष्ट्रपतींच्या हाती जाऊ शकतात आणि राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र संबोधतो. या पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वी कधी उद्भवली नाही आणि यापुढेही उद्भवणार नाही, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल, असे देखील त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

सत्ता स्थापनेच्या तिढ्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, आम्ही सध्या एकत्र हा तिढा कसा सोडवता येईल याचा विचार करत आहोत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. राज्यात महायुतीचेच सरकार यावे अशी त्यांची इच्छा आहे. शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी हेच तिढ्याचे मुख्य कारण आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील स्वत:ला शिवसैनिकच समजतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच दिल्यासारखे असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

सध्या राज्यपातळीवर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आवश्यकता असल्यास राष्ट्रीय पातळीवर या संबंधित चर्चा होईल, तसेच येत्या आठवड्यात नवे सरकार सत्तेत येईल असा विश्वास देखील मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com