खासदार नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाल्या – ‘शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाता कामा नये अन्यथा…’

अमरावतीः पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर भागातील नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी सरसकट सर्वेक्षण करा,, कुठल्याच परिस्थितीमध्ये शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना करा, अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ओल्या दुष्काळाने प्रभावित झालेल्या भागाला भेट दिली. ते अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांच्या भेटीसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या आठ दिवसांपासून एका गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क झालेला नाही. संकट अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा ऊस, सोयाबीन, कांदा सर्व काही नेस्तानाबूत झालं आहे. अधिकारी अजूनही आलेले नाहीत. पंचनामे झाले नाहीत. मुळात पंचनाम्याची गरजच नाही. सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी म्हणून आम्ही सरकारवर दबाव आणू, असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच केंद्र सरकारकडे मदत मागितल्यास बिघडतं कुठ, असा सवाल उद्धव ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यात विचारल्यानंतर फडणवीसांचा संताप दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट लडाखला जातात, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये, असंही फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं.

नुकसानग्रस्त शेतक-यांना काय मदत करणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगणं अपेक्षित आहे. परंतु अशा प्रकारची थिल्लरबाजी त्यांना शोभत नाही. मुख्यमंत्र्यांना माहित नसेल, मोदीजी तर थेट लडाखला जातात, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये, असे ते म्हणाले.