भाजप आमदाराने विधिमंडळात उठविला आवाज, म्हणाले – ‘पुण्यातील बेकायदा मद्यविक्री अन् वाहतूकीवर कारवाई कधी करणार ?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात बेकायदा दारूविक्री आणि मद्यवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने महसूल बुडून राज्य शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा आमदार भिमराव तापकीर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात बुधवारी (दि. 10) उपस्थित केला. तसेच शहरात विनापरवाना मद्यविक्री होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा आमदार तापकीर यांनी संबधित खात्याच्या मंत्र्यांना केली.

विधीमंडळात आमदार तापकीर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर देताना म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहरात 1 जानेवारी 2021 ते 22 फेब्रुवारी 2021 या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक करणाऱ्या संबंधितांविरुध्द एकूण 53 गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणी 33 आरोपींना अटक केली असून 7 लाख 88 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 501 गुन्हे नोंदविले असून 320 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एकूण 17 वाहने जप्त केली आहेत. कारवाई दरम्यान 1 कोटी 14 लाख 13 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वळसे- पाटील यांनी दिली आहे.