‘भाजपला मदत करणारे अधिकारी शोधून तातडीने दूर करा’ – काँग्रेस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सरकार बदलले तरी भाजपशी जवळीक असणारे अनेक अधिकारी आजही महत्त्वाच्या पदावर आहेत. त्या अधिकाऱ्यांना तातडीने बदलण्याची गरज आहे. तसे बदल केले नाही तर हे अधिकारी सरकारमधील माहिती भाजपाला देतील. सातत्याने हेच होत आल्याचे दिसत आहे. त्यामुळे असे अधिकारी शोधून तातडीने त्यांना दूर करणे हा महत्त्वाचा विषय मुख्यमंत्र्यांनी हातात घ्यावा, अशी चर्चा कॉंग्रेस मंत्र्याच्या आढावा बैठकीत झाली. सर्व मंत्र्यांची मते आम्ही जाणून घेतली. बैठकीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना आणि मुख्यमंत्र्यांना देखील देणार असल्याचे सांगण्यात आले.

आढावा बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे आहे. तिघांनी एकत्र येऊन संकटांचा सामना केला पाहिजे. सरकारवर ज्या पद्धतीने भाजप हल्ला चढवत आहे, तो पाहता या राजकीय हल्ल्यांना एकत्रितपणे उत्तर देण्याची गरज आहे. मात्र तसे न होता ज्या पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप होत आहे. त्याच पक्षाचे मंत्री उत्तर देताना दिसत आहे. असे होऊ द्यायचे नसेल आणि एकत्रितपणे सगळ्यांचे सरकार आहे असे दाखवायचे असेल तर विश्वासात घेऊन रणनीती ठरवावी लागेल, यावरही बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या पक्षाचे मंत्री जाऊन भेटतात. माहिती देतात, त्यात गैर काही नाही. मात्र तीनही पक्षांमध्ये वाद-विवाद झाल्यास किंवा सरकारवर काही गंडांतर आल्यास समन्वय समितीची बैठक घेऊन त्यातून मार्ग काढावा, असे सरकार स्थापन करताना ठरले होते. समन्वय समितीची बैठक तातडीने घ्यावी. जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, याची वस्तुस्थिती सर्व मंत्र्यांना विश्वासात घेऊन सांगितली जावी, असेही काही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.