पुण्यात ‘कोरोना’ तपासणीच्या नावाखाली घरात शिरण्याच्या घटना, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांनी केलं हे आवाहन, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची दशहत पुणेकरांवर असताना शहरात याच कोरोनाच्या तपासणीच्या (सर्व्हे) नावाखाली घरात शिरत असल्याच्या धक्कादायक घटना घडू लागल्या आहेत. अशा तक्रारी कानावर आल्या असून घरात प्रवेश देताना त्याचे ओळखपत्र पहावे. तसेच काही संशयास्पद वाटत असल्यास तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्त यांनी केले आहे. यामुळे मात्र पुणेकरांची चिंता वाढली आहे.

शहरात एकीकडे कोरोनाने हैदोस घातला आहे. काही केल्या तो आटोक्यात येत नाही. कोरोनाबाबत आरोग्य विभाग व पालिका विभाग वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत आहे. त्यात सर्व्हे, तपासणी आणि माहिती घेतली जात आहे. पण शहरात आरोग्य विभागाच्या नावाखाली काही जणांकडून सर्व्हेची बतावणी करत घरात शिरण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासकीय विभागाचे कर्मचारी असल्याचे सांगून घरात शिरत असल्याच्या काही तक्रारी कानावर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही व्यक्तीला घरात प्रवेश देउ नये. प्रथमत: संबंधिताला त्यांचे ओळखपत्र विचारण्यास प्राधान्य द्यावे. तसेच काही संशयास्पद वाटत असल्यास तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी असे गुप्ता यांनी सांगितले.

पुण्यात काम करताना गंभीर गुन्हे व गुन्हेगारांवर विशेष लक्ष देण्यावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांना रात्रीच्या वेळी सुरक्षित वाटले पाहिजे, असे वातावारण तयार करण्याचा प्रयत्न राहणार आहे, त्यासाठी बेसिक पोलिसांवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.