‘आघाडी’ आणि ‘युती’ पेक्षा राज्यातील आमदारांना ‘हे’ २ पक्ष वाटताहेत ‘सरस’

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि पक्षांना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महायुतीचा आत्मविश्वास दुणावला असून महाआघाडीच्या नेत्यांपुढे पुन्हा एकदा आपल्या पक्षाला बळकटी देण्याचे आव्हान आहे. विविध राजकीय पक्ष आणि संघटना या पराभवानंतर विविध पर्यायांची चाचपणी करत आहेत.

या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी आपले उमेदवार न देता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचाराचे रान उठवले होते. राज्यभरात १० मोठ्या सभा घेऊन त्यांनी महायुतीला मतदान न करण्याचे मतदारांना आवाहन केले होते. मात्र या प्रचाराचा त्यांना मतदानात फायदा झालेला दिसून आला नाही. त्यामुळे या विधानसभेला राज ठाकरे सावध भूमिका घेत आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाआघाडीमध्ये देखील त्यांना सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र या सगळ्यात राज ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता या सगळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विधानसभेत देखील पराभव होण्याची चिन्हे दिसू लागल्याने त्यांनी आता वेगळी वाट निवडण्याची तयारी सुरु केली असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी युतीसोबत वंचित बहुजन आघाडीची वाट धरल्याचे समोर येत आहे. तर काहींनी मनसेचे नेते राज ठाकरे यांचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली आहे.

काल प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे १० आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर काँग्रेसचे देखील आमदार आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे देखील दरवाजे अनेकांनी ठोकायला सुरुवात केली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. अनेक आमदार युतीमध्ये जाण्यास इच्छुक असले तरी येतेवेळी त्यांची युती झाल्याने जवळपास सर्वच जागा नक्की असल्याने या आमदारांना कोणी तिकिट देणार नसल्याने त्यांनी वंचित आणि मनसेचा रस्ता पकडल्याचे देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.