देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध ‘याचिका’ करणाऱ्यास 2 लाखांचा दंड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅट्रोसिटीचा गुन्ह्याची माहिती निवडणुक अर्ज भरताना लपून ठेवली हा आरोप सिद्ध न करता आल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास नागपूर खंडपीठाने २ लाखांचा दंड ठोठावला आहे. फडणवीस यांनी अ‍ॅट्रासिटीचे प्रकरण लपवून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. दावा सिद्ध न करू शकल्याने वैयक्तिक हित साध्य करण्यासाठी याचिका केल्याचा ठपका ठेवत याचिकाकर्त्यावर न्यायालयाने दंड ठोठावला.

सुरेश रंगारी असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्यांनी वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस ठाण्यात फडणवीस यांच्याविरुद्ध १ जानेवारी २०१९ ला तक्रार दिली होती. फडणवीस यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी उमेदवारी अर्ज भरताना फडणवीस यांनी या गुन्ह्याची माहिती लपवून ठेवली, असा दावा याचिकाकर्त्याने केला. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे १० ऑक्टोबरला तक्रार केली होती. मात्र या तक्रारीवर काही कारवाई न झाल्याने त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणाची न्यायमूर्ती झका हक व न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर याच्यासमोर सुनावणी झाली.

न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकली. यादरम्यान याचिकाकर्त्यास त्याचा दावा सिद्ध करण्यात यश आले नाही. त्यामुळे केवळ वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठीच ही याचिका करण्यात आल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. हा ठपका ठेवत त्याच्यावर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. २९ नोव्हेंबरपर्यंत उच्च न्यायालयाच्या निबंधक कार्यालयात हा दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Visit :  Policenama.com