महाबळेश्वर प्रकरण : DHFL चे प्रमोटर वाधवान यांच्यासह 23 यांच्याविरुद्ध FIR दाखल, प्रधान सचिव ‘सक्ती’च्या रजेवर

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  DHFL चे प्रमोटर्स आणि एस बँकच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कपील आणि धीरज वाधवान बंधू यांच्यावर महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंडाळ्याहून महाबळेश्वर येथे लॉकडाऊनच्या काळात प्रवास केल्याने राज्यात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाहतूकीचा परवाना पत्र दिल्याने वाधवान बंधू हे त्यांच्या २३ कुटुंबियांना घेऊन महाबळेश्वर येथे गेले आहेत. महाबळेश्वर पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात दिलेल्या आदेशाचा भंग केल्यावरुन कपिल वाधवान आणि त्यांच्या २२ कुटुंबीय आणि कर्मचार्‍यांविरोधात १८८ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

याअगोदर वाधवान कुटुंबियांना खंडाळा ते महाबळेश्वर असा विशेष प्रवास परवाना पत्र दिल्याच्या कारणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  गृह मंत्रालयातील विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा मोठा निर्णय रात्री उशिरा घेतला. हे वाधवान बंधू आपल्या ५ आलिशान कार्समधून २३ कुटुंबियांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असताना गेले होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा प्रकरणाला वाचा फोडून गृहमंत्र्यांच्या सहमतीशिवाय असे पत्र कोणता अधिकारी देऊ शकणार नाही, अस आरोप केला होता.

त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अगोदर या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे जाहीर झाले. मात्र, सामान्यांना दंडुका आणि श्रीमंताचे धेंडांचे चोचले, आरोपींना थंड हवेच्या ठिकाणी फिरायला मुभा  अशी टिका सुरु झाली. त्यानंतर रात्री उशिरा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली व त्यानंतर त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश काढला. पहाटे २ वाजता त्यांनी यासंबंधीचे ट्विट करुन माहिती दिली.

गृहमंत्रालयाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या लेटरहेडवर वाहतूकीच्या परवानगीचे पत्र आहे. ८ एप्रिल अशी त्यावर तारीखही आहे. ही मंडळी माझ्या ओळखीची असून कौटुंबिक मित्र आहेत. तातडीच्या कौटुंबिक कामासाठी त्यांना खंडाळ्याहून महाबळेश्वरला जात आहेत. त्यांना तिथे पोहोचता यावेत, यासाठी सहकार्य करावे, असे त्या पत्रात म्हटले आहे. या पत्रावरुन किरीट सोमय्या यांनी सरकारला लक्ष्य केले होते. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी गृहमंत्र्यांचीच चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

वाधवान बंधू कुटुंबियांसमवेत २३ लोकांना हा पास दिला गेला. बेलवर असणारे वाधवान यांना कसा प्रवास पास मिळतो, याची चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी राज्यपाल यांच्याकडे केली आहे. कोरोना विषाणूशी लढताना हा सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावरुन राजकीय आरोप करण्याची संधी भाजपला मिळाली. त्यामुळे सरकारने मध्यरात्री गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला.