‘फेक न्यूज’व्दारे ‘विद्यमान’ नगरसेवकाची बदनामी केल्याप्रकरणी कोंढव्यातील 6 जणांवर FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – वेगवेगळ्या न्यूज चॅनेलचे सध्या उदंड पीक आले आहे. त्याचा गैरफायदा घेत एखाद्या न्यूज चॅनेलची बातमी असल्याचे भासवित कोंढव्यात नगरसेवकाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त पोलीसनामामध्ये झळकताच ते कोंढवा परिसरात व्हायरल झाले. कोंढवा पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेतली असून मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नगरसेविका परविन फिरोज शेख (वय ४५, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, कोंढवा पोलिसांनी हनीफ शेख, इरफान मुलाणी, अख्तर पिरजादे, नसरीन माला, शरीफा, इरशाद शेख अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, माझे पती हाजी फिरोज शेख हे ऑल कोंढवा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. काही दिवसांपूर्वी ‘‘पुणे मनपाच्या कोंढवा भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका भष्ट्राचार करीत आहेत, पुण्यातील काही नगरसेवक झाले बिल्डरांचे दलाल व पतीच्या सहाय्याने भरत आहेत बिल्डरांचे खिसे,’’ असा ३ मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ गगन एमरॉल्ड सोसायटीमध्ये घेतलेला दिसून येत आहे. तसेच व्हिडिओमध्ये गगन एमरॉल्ड सोसायटीचे जागेबद्दल वाद असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर या सोसायटीच्या जागेचा व माझा तसेच माझे पत्नीचा कधीही कुठलाही संंबंध नसताना आमची समाजामध्ये प्रतिमा मलिन करण्याचे उद्देशाने हे षडयंत्र कोणीतरी रचले असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ नीट पाहिला असता कोणीतरी हा व्हिडिओ न्यूज चॅनेलची बातमी असल्यासारखा खोटा न्यूज चॅनेलची निर्मिती करुन असे कोणतेही न्यूज चॅनेल अस्तित्वात नसताना समाजामध्ये आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटी बातमी प्रसारित केली. त्यानंतर ती खोटी न्यूज चॅनेलसारखा दिसणारा व्हिडिओ व्हायरल करुन आमची बदनामी केली, असे फिरोज शेख यांनी त्यांच्या अर्जात म्हटले होते. एखाद्या न्यूज चॅनेलसारखी बातमी तयार करुन तो व्हिडिओ व्हायरल करुन लोकांची बदनामी करण्याचा हा नवा प्रकार समोर आला आहे.

परवीन शेख यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता इरशाद शेख हा अचानकपणे त्याचे मित्र उस्मान शेख, मुजममिल शेख व नदीम शेख यांच्यासह आमच्या घरी आला व माझे पतीला म्हणाला की, “मुझे ये क्लीप गगन एमरल्ड सोसायटीचे चेअरमन हनीफ शेख ने भेजी थी और मैने वो क्लीप अलग अलग व्हट्सअप गु्रपवर सेंड की है. अभी ये मामला बैठकर खत्म करते है”, असे म्हणून तो मित्रांसह निघून गेला. त्यामुळे ही बनावट व्हिडिओ चेअरमन हनीफ शेख, तसेच सोसायटीतील रहिवासी इरफान मुलाणी, अख्तर पिरजादे, नसरीन माला व शरीफा यांनी ही क्लीप बनवून इरशाद शेख याच्या मार्फत व्हाटसअ‍ॅप ग्रुपवर प्रसारित करुन आपल्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तपासा मध्ये काही राजकीय लोकांचे नावे येण्याची शक्यता आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा