100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची CBI कडून चौकशी सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूध्द केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केला असून आज सकाळपासून त्यांच्या मुंबई, नागपूर येथील घरांवर आणि छापेमारी केली. दरम्यान, यांची 100 कोटींच्या वसुली प्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. आणखी काही वेळ ही चौकशी सुरू राहणार असल्याचं कळतंय. देशमुख यांना चौकशीसाठी सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही मात्र सीबीआय देशमुखांकडे 100 कोटींच्या वसुलीबाबत कसुन चौकशी करीत असल्याचं सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूध्द सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या हप्ता वसुलीचे आरोप केले होते. प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय देशमुख यांची चौकशी करीत होते. दरम्यान, आज देशमुख यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली तर त्यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पथकाने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी सुरू असतानाच देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलं असुन त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यास सुरवात केली आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला सीबीआयनं अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.