परळीत भाजप आमदारासह 22 जणांवर FIR दाखल

पोलिसनामा ऑनलाईन – जमावबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यामुळे भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांविरुद्ध परळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि संचार बंदीचे नियम पाळण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्रा, लोकप्रतिनिधींकडूनच या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार रमेश कराड यांच्यासह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार रमेश कराड यांनी गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास परळी येथील गोपीनाथ गडावर जाऊन भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. आमदार रमेश कराड यांनी गोपीनाथ गड येथे येत असल्याची पोलिस प्रशासनाला कोणतीही पूर्व कल्पना दिली नव्हती. ते अचानकपणे गोपीनाथ गडावर दर्शनासाठी आले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. शालिनी कराड, आणि शेकडो कार्यकर्ते होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांनी जीवितास धोका आहे. तसेच सोशल डिस्टसिंग न पाळल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.