बनावट दस्त नोंदणी प्रकरणात वकिलासह पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील पर्वती येथील जमीन गिळंकृत करण्याच्या उद्देशाने अ‍ॅड. उमेश चंद्रशेखर मोरे याने मंगेश दिनकर कुलकर्णी (वय-७७) नावाचा खोटा इसम सह दुय्यम निबंधक कार्य़ालयात हजर करुन जमीनीचे दत्तात्रय गिरी यांचे नावे इच्छापत्र लिहून घेत त्याची नोंदणी करुन घेतली. याप्रकरणी अ‍ॅड. उमेश मोरे याच्यासह इतर साक्षीदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्ररकणात मंगेश दिनकर कुलकर्णी या अज्ञात नावाच्या इसमासह खोटा दस्त तयार करणारा प्रसाद सुदाम पाटील, अ‍ॅड. उमेश चंद्रशेखर मोरे, किशोर शांताराम सकट, अमोल बापु थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हवेलीचे प्रभारी सह दुय्यम निबंधक अनिरुद्ध प्रकाश सोनटक्के (वय-३७) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अ‍ॅड. उमेश मोरे याने पुण्यातील पर्वती येथील जमीन हडपण्यासाठी मंगेश दिनकर कुलकर्णी नावाचा खोटा इसम दुय्यम निबंधक कार्यालयात हजर केला. दिनकर कुलकर्णी या तोतया व्यक्तीने आपणच दिनकर कुलकर्णी असल्याची कागपत्रे निबंधक कार्य़ालयात सादर केली. कुलकर्णीने आपले मृत्यूपत्राचा दस्त प्रसाद पाटील याच्याकडून तयार करुन पर्वती येथील जमीन दत्तात्रय गिरी यांच्या नावाने केली. दस्त नोंदणी करताना अ‍ॅड. उमेश मोरे याने आणि साक्षीदार यांनी त्यांची कागदपत्र दुय्यम निबधक कार्य़ालयात सादर केली होती.

दरम्यान, रविंद्र बराटे यांनी दुय्यम निबंधक कार्य़ालयात तक्रारी अर्ज दाखल करुन हा दस्त बनावट व बोगस असल्याची तक्रार केली होती. बराटे यांनी केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असता अ‍ॅड. उमेश मोरे याने पर्वती येथील जमीन गिळंकृत करण्यासाठी खोटे इसम सादर केल्याचे तपासात समोर आले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हवेलीचे प्रभारी दुय्यम निबंधक यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यांच्या फिर्य़ादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे करीत आहेत.