आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात ‘अ‍ॅस्ट्रॉसिटी’चा गुन्हा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिनं फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते स्वप्नील गोविंद जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. केतकीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकी चितळेनं 1 मार्च 2020 रोजी एक पोस्ट शेअर केली होती. अनेक धर्मांचा उल्लेख असलेल्या या पोस्टमध्ये तिनं म्हटलं होतं की, “नवबौद्ध, 6 डिसेंबर रोजी फुकट मुंबई दर्शनाला येतात. तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू असा शब्द उच्चारला तर घोर पापी, कट्टरवादी? परंतु अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही तर आमचीच आहे. आम्ही स्वत:च्याच भांडण्यात इतके बिजी झालो आहोत, आम्हाला आमच्यात फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो की, स्वत:चा धर्म विसरतो.” स्वप्नील गोविंद जगताप यांनी नवबौद्धांसंर्दभातल्या वाक्यावर आक्षेप घेतला आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पुढे आपल्या पोस्टमध्ये केतकी म्हणते, “ब्राह्मण द्वेष किंवा बाह्मण कसे श्रेष्ठ यात आम्ही इतके गुंतलो आहोत की, मुसलमान, ख्रिश्चन मिळून ब्राह्मणांना हकलवून लावू असंही म्हणतो. आपण तर महापुरुषांनाही नाही सोडलं. त्यांची वाटणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे, सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे. आपणच आपली लायकी काढली आणि अजूनही काढतोय. मला कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष नाही. परंतु धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा द्वेष नक्कीच आहे.” असंही ती म्हटली आहे.