राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भावाविरोधात FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर अपशब्द वापरून वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भावाविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 10) रात्री उघडकीस आला.

सागर रामसिंग कोल्हे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे- नाशिक जलदगती रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. त्यावरून खासदार कोल्हे यांचे मोठे भाऊ सागर कोल्हे यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवरून खासदार आढळराव पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरून वादग्रस्त पोस्ट प्रसिध्द केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणी गांजाळे यांनी मंचर पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर कोल्हे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान खासदार कोल्हे यांनी भावाच्या या घाणेरड्या वर्तणुकीबद्दल माफी मागावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा गांजाळे यांनी दिला आहे.