‘महामारी’ अ‍ॅक्टनुसार राहुल आणि प्रियंका गांधी विरोधात FIR

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील इकोटेक पोलीस ठाण्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याविरोधात महामारी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह 153 कार्यकर्ते आणि 50 इतर लोकांवर 155/2020, 188, 269, 270 आयपीसी अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर पोलीस ठाण्याच्या मीडिया विभागाने ही माहिती दिली आहे.

हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी काल राहुल आणि प्रियंका गांधी यांनी लाँग मार्च काढला होता. या दरम्यान त्यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप होतो आहे. तर प्रियंका गांधी यांना पोलिसांनी कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखले होते. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लोकांनी गर्दी करण्यास मनाई करण्यात आलेली होती. सीमेवर बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. तरीही काँग्रेस नेत्यांनी एपॅडेमिक अ‍ॅक्टचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसमध्ये आले होते.