Baramati : 10 लाखांच्या खंडणी प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्यावर FIR

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –   न्यायालयात केलेल्या तक्रारी काढून घ्याव्यात, त्रास देऊ नये, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्याने तब्बल 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश संभाजी पोमणे (रा. गुणवडी ता. बारामती) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी संजय भास्कर अवचट (रा. साईगणेशनगर, बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय अवचट यांनी तक्रारीमध्ये असे नमूद केल्याप्रमाणे, न्यायालयात केलेल्या सर्व तक्रारी काढून घ्याव्यात आणि कोणत्याही प्रकारचा त्रास देवू नये. यासाठी 26 मार्च रोजी गणेश पोमणे या माहिती अधिकार कार्यकर्त्याने 10 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली.

तसेच खंडणी दिली नाही तर, माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून त्रास देईन. गॅस एजन्सी बंद पाडेन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरुन बारामती शहर पोलिसांनी गणेश संभाजी पोमणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.