शरजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी FIR

जालना : पोलीसनामा ऑनलाइन –   अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याच्यावर महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात काही आक्षेपार्ह ट्विट करण्यात आल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी (दि.20) दिली.

जालना जिल्ह्यातील अंबड येथील हिंदू जागरण मंचात काम करणाऱ्या अंबादास अंभोरे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादेमध्ये त्यांनी म्हटले आहे की, उस्मानी यांनी ट्विटरवर नुकत्याच झालेल्या काही पोस्टमध्ये भगवान राम यांच्याबद्दल अनादर शब्दांचा वापर केला आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असे अंभोरे यांनी म्हटले आहे.

अंबादास अंभोरे यांच्या तक्रारीच्या आधारे अंबड पोलिसांनी उस्मानीविरोधात बुधवारी (दि.19) रात्री भारतीय दंड संहिता कलम 295-अ (धार्मिक भावनांना भडकावणारे द्वेषपूर्ण कृत्य) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच हे प्रकरण जालना सायबर विभागाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुणे पोलिसांनी 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेच्या वेळी केलेल्या भाषणावरुन उस्मानीविरोधात आयपीसी कलम 153 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात उस्मानी याने मार्चमध्ये पुणे पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला होता.