पहिला FIR : गृहनिर्माण सोसायटीनं प्रवेश नाकारला, पुणे पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात चतु:श्रुगी परिसरात घर शिफ्टिंगदरम्यान एका कुटुंबाकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करत सोसायटीत प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण सोसायटीवर दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे. सोसायटीचे सचिव सुनिल अनंत शिवतारे (वय 53 ) यांच्याविरोधात चतू:र्शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिबंधक स्नेहा जोशी यांनी फिर्याद दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सोसायट्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस प्रशासन यांच्या वतीने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची केवळ अंमलबजावणी करावी. कोरोनासाठी सहकारी गृहनिर्माण सोसायटी यांनी स्वत:चे नियम तयार करू नयेत, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करत औध येथील रोहन निलय या सोसायटीच्या सचिवांनी नव्याने भाडेकरू म्हणून राहण्यासाठी आलेल्या सुधीर प्रकाश मेस्सी (वय ३४) यांच्या कुटुंबीयांकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली. वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय तुमच्या कुटुंबीयांना सोसायटीत प्रवेश करता येणार नाही, असे सोसायटीचे सचिव शिवतारे यांनी सांगितले. तर या कुटुंबाला सोसायटीत प्रवेश देण्यास मज्जाव केल्याने मेस्सी यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेत तहसीलदार तृप्ती पाटील यांनी उपनिबंधक स्नेहा जोशी यांना या प्रकरणाची शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिबंधक जोशी यांनी रोहन नीलय या सोसायटीला भेट देऊन चौकशी केली असता सोसायटीचे सचिव शिवतारे यांनी भाडेकरू सुधीर मेस्सी यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केल्याचे समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत सोसायटीच्या सचिवांनी परस्पर नव्याने नियम तयार करून त्याची अंमलबजावणी केली. हा प्रकार जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचा भंग आहे, त्यामुळे सोसायटीचे सचिव शिवतारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने दाखल केलेला हा पहिला गुन्हा असल्याची माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.