जिवंत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी नेल्याची पालिकेवर टीका करत Fake व्हिडीओ व्हायरल करणार्‍याविरूध्द FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता त्यामध्ये जिवंत असतानाही कोरोनाबाधित रुग्णाला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन गेल्याचा दावाही केला होता. त्याच बरोबर त्या व्यक्तीने मुंबई महापालिकेवर आरोप केले होते. मात्र आता चौकशीतून हा व्हिडीओ फेक असल्याचे समोर आले. दरम्यान, या प्रकरणी महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रणिता टिपरे यांच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे.

जिवंत कोरोनाबाधित रुग्णाला किटमध्ये बांधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यावेळी तो जिवंत असल्याचे समोर आले. असे या व्हिडिओत आहे. हा व्हिडीओ सुरेश नाखुआ या व्यक्तीने ट्विट करत एक कॅपशनही त्याला दिले त्यामध्ये बीएमसीने एक जिवंत माणूस स्मशानात नेला. मला वाटते की महाविकास आघाडी सरकारचे स्मशानभूमीतून काही महावसुलीचे टार्गेट असेल. असे नमुद केले होते. हा व्हिडीओ ट्विट झाल्यानंतर पालिकेच्या ट्विटर हॅण्डलवरून याला उत्तर देण्यात आले.

सर आपल्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानुसार आम्ही तुम्हाला विनंती केली की, या व्हिडिओचे मूळ आणि सत्यता तपासून पाहा. परंतु तुम्हालाही या व्हिडीओचे मूळ स्थान आणि सत्यता या बद्दल खात्री नव्हती. पुढे संबंधिताने याबाबत वरिष्ठांना माहिती देणार असल्याचे सांगितले. वरिष्ठांनी संपर्क साधला त्यावेळीही वेगवगेळी कारणे देत माहिती टाळण्यात आली. त्यानंतर प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर या प्रकरणी सखोल चौकशी केली करण्यात आली. त्यामध्ये अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले.

चौकशीत तो व्हिडिओ फेक असल्याचे स्पष्ट होताच तो अहवालही नाखुआ यांना व्हॉट्सएप करण्यात आला. व्हिडिओची खातरजमा न करता संबंधित व्यक्तीने जाणीवपूर्वक तो शेअर करत, पालिकेची बदनामी केली. त्यात नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा ५४ अन्वये अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेने ट्विट करत याबाबत माहिती दिली.

गुन्हा दाखल होताच जाहीर माफी
भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद कांबळे यांनी गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच गुन्हा दाखल होताच संबंधित व्यक्तीने जाहीर माफीदेखील मागितल्याचे त्यांनी सांगितले.