राधाकृष्ण विखे-पाटलांसंदर्भातील ‘त्या’ वृत्ताप्रकरणी पोलिस ठाण्यात FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काॅंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश करण्‍याबाबतचे वृत्‍त समाजमाध्‍यमातुन प्रसारित केल्‍याच्‍या कारणाने संबधितांच्‍या विरोधात लोणी बुद्रूकचे सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांनी दिलेल्‍या तक्रारीवरुन लोणी पोलिस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

या संदर्भात दिलेल्‍या तक्रारीत लक्ष्‍मण बनसोडे यांनी म्‍हटले आहे की, माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विरोधात काही वेबपोर्टल, व्टिटर आणि वृत्‍तपत्राच्‍या ऑनलाइन बातम्‍यांमध्‍ये बदनामीकारक व समाजामध्‍ये संभ्रम निर्माण करणारे वृत्‍त कोणताही संदर्भ व पुरावा नसताना केवळ सुत्र या आशयाने प्रसारीत करण्‍यात आले.

याबाबतची सत्‍यता जाणुन घेतल्‍यानंतरच आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांना केवळ बदनाम करण्‍याच्‍या कारणाने तसेच जनसामान्‍यांमध्‍ये त्‍यांची असलेली विश्‍वासार्हता कमी व्‍हावी या उद्देशाने सदरचा खोटा संदेश व बातमी प्रसिध्‍द केली याकडे लक्ष वेधण्‍यात आले आहे.

सदरचे वृत्‍त आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या अनेक चाहत्‍यांनी वाचले आहे. अशा सर्व वाचकांच्‍या मनामध्‍ये विखे पाटलांची प्रतिमा मलिन होवून बदनामी करण्‍याच्‍या कारणाने जाणीपुर्वक प्रसारित झालेले वृत्‍त देणाऱ्यांची चौकशी करुन त्‍यांच्‍यावर कारवाई करावी अशी मागणी या अर्जात करण्‍यात आली आहे. सरपंच लक्ष्‍मण बनसोडे यांच्‍या तक्रारीवरुन लोणी पोलिसांनी दि.२८ डिसेंबर २०१९ रोजी ८४५/२०१९ अन्‍वये भारतीय दंडविधान कलम ५०० अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/