खंडणी व दमदाटी केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह अन्य एकावर FIR दाखल

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यातील करडे येथील भाजप विद्यार्थी आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षासह अन्य एक जणाविरोधात दमदाटी करण्याबरोबरच खंडणी मागितल्याप्रकरणी शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकनाथ दगडू घायतडक (रा.करडे) यांनी फिर्याद दिली आहे. तर विशाल निळकंठ घायतडक (भाजपा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष) व बंटी अरुण घायतडक( रा.करडे ता. शिरूर) या दोघांविरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे खंडणी दमदाटी करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार करडे येथे गट नं. ५१० येथे फिर्यादी एकनाथ घायतडक यांची जमीन असून, इतर चार भावासह एकूण साडे सोळा एकर जमीन आहे. सदर जमिनीत आरोपी विशाल व बंटी यांचा काहीही संबंध नसतानाही जमिनीतील 2 ते 4 गुंठे जमीन आम्हाला द्या अशी वारंवार मागणी व धमकी, दमदाटी करत हे दोघे फिर्यादीस खंडणी मागत होते.दिनांक 11 ऑगस्ट रोजी फिर्यादी व त्यांचा भाऊ हे दोघे जण मोटरसायकल वरून करडे येथून शिरूर कडे येत असताना करडे घाटाजवळ आरोपी विशाल व बंटी यांनी त्यांची चार चाकी गाडी (एम एच १२ के वाय ५२४२) या दुचाकीला आडवी मारून दुचाकी थांबविली यातून दोघेही खाली उतरले व त्याने फिर्यादीस तुम्हाला मागितलेली जमीन देता अगर कसे असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

यावेळी फिर्यादी याने या जमिनीमध्ये तुमचा काहीही संबंध नाही असे सांगितल्यानंतर आरोपी यांनी त्यांच्या गाडीतून हॉकी स्टिक काढून आणली. यामुळे फिर्यादी व त्याचा भाऊ घाबरून दुचाकीवर बसून दुचाकीसह निघाले असता आरोपींनी त्यांच्या हातातील हॉकी स्टिक फेकून मारली.आणि ती मोटरसायकलच्या इंडिकेटरवर लागल्याने इंडीकेटर तुटला. याबाबत फिर्यादी यांनी तात्काळ शिरूर पोलिस स्टेशन येथे येऊन फिर्याद दिली असून याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करीत आहे. तर मिळालेल्या माहिती नुसार या गुन्ह्यातील जिल्हाध्यक्षांवर यापुर्वीदेखील गुन्हे दाखल आहेत.