राम मंदिरासाठी अवैध देणगी वसुली; राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात FIR दाखल

मुरादाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – अयोध्येत भव्य राम मंदिराच्या (ram mandir)  उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्यावतीने देशभरातून देणगी गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, मंदिर (ram mandir) उभारणीसाठी निधी गोळा करताना काही हिंदू संघटनांकडून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये उघडकीस आली आहे. राष्ट्रीय बजरंग दल या संघटनेकडून चक्क बनावट पावती पुस्तक छापून अवैध देणगी वसूल केली जात असल्याचे समोर आले आले. या प्रकरणी संघटनेच्या पदाधिका-याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत राम मंदिर निधी समर्पण समितीचे मंत्री प्रभात गोयल म्हणाले की, आमचे काही कार्यकर्ते मुरादाबादमधील कृष्णा नगर भागात राम मंदिर उभारणीसाठी देणगी जमा करायला गेले होते. तेंव्हा दोन दिवसांपूर्वीच आम्ही देणग्या दिल्याचे सांगत स्थानिकांनी पावत्याही दाखवल्या. त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी शोध घेतला. तेंव्हा राष्ट्रीय बजरंग दल नामक संघटनेकडून देणग्या जमा केले जात असल्याची माहिती मिळाली. मंदिराच्या उभारणीसाठी देणग्या जमा करण्याचा अधिकार कोणालाही नाही. विश्व हिंदू परिषदेकडून विविध भागांतून देणग्या गोळा करण्यासाठी विशेष पथक तयार केले जाते. पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. यासाठी विशेष रचना आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

विश्व हिंदू परिषदेची युवा संघटना बजरंग दल आहे. राष्ट्रीय बजरंग दलाचा आणि विश्व हिंदू परिषदेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे कथित राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदर संघटनेने आमच्या पावत्यांची नक्कल करून बनावट पावती पुस्तक छापले आहे. त्यामुळे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती गोयल यांनी दिली.